नवी दिल्ली: एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना, दुसरीकडे पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकींचे एक्झिट पोल येत असल्यामुळे राजकीय रण तापताना दिसत आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीच्या निकालांकडेही देशाचे लक्ष लागले आहे. पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा होत असली, तरी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची जादू चालणार असून, भाजपप्रणित NDA सत्तेत येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. (puducherry exit poll result 2021 nda may win assembly election congress upa bjp)
पंतप्रधाननरेंद्र मोदींचा या ठिकाणी करिष्मा दिसून येणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून, काँग्रेस आणि डीएमके आघाडीचे पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रपती राजवट असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात ६ एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. एकाच टप्प्यात विधानसभेच्या ३० जागांसाठी मतदान पार पडले. पश्चिम बंगालमधील आठव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल आले आहेत.
केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार!
कुणाला किती जागा मिळणार?
टीव्ही ९-पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित NDA ला १७ ते १९ जागा, काँग्रेसप्रणित UPA ला ११ ते १३ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, भाजपप्रणित NDA ला २१ जागा, काँग्रेसप्रणित UPA ला ८ जागांवर विजय मिळेल, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपप्रणित NDA ला २० ते २४ जागा, काँग्रेसप्रणित UPA ला ६ ते १० जागा आणि अन्यला ०१ जागा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
पुन्हा ममता दीदी की मोदी?; पश्चिम बंगालमध्ये भाजपाची मुसंडी नक्की, पण...
भाजपची स्थानिक पक्षांना साद
भाजपने स्थानिक पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. पुद्दुचेरीच्या विधानसभेवर केंद्र सरकारकडून तीन सदस्यांची शिफारस केली जाते. पुद्दुचेरीमध्ये निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी तिथले सरकार कोसळले होते. काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे संकटात आलेले पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर पडले. आमदारांनी साथ सोडल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी राजीनामा दिला होता.
तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'
दरम्यान, देशभरात आसाम, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी पोटनिवडणुकाही घेण्यात आल्या. या सर्वांची मतमोजणी २ मे रोजी होणार असून, मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला आहे, हे स्पष्ट होईल.