Puja Khedkar row : नवी दिली : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, पूजा खेडकरने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पटियाला हाऊस न्यायालयाने १ ऑगस्टला पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी खंडपीठाने दिल्ली पोलीस आणि यूपीएससीला नोटीस बजावली आहे. तसंच, उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना पूजा खेडकरला २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २१ ऑगस्टला होणार आहे.
दरम्यान, नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे. पूजा खेडकरच्या विरोधात अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यातील एका तक्रारीत नागरी सेवा परीक्षेत परवानगीपेक्षा जास्त संधी मिळविण्यासाठी स्वत:ची खोटी ओळख करून दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. युपीएससीने दिलेल्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तिला अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिने दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, पटियाला हाऊस न्यायालयाने १ ऑगस्टला पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आयएएस पद रद्द!दरम्यान, पूजा खेडकरने प्रशिक्षणार्थी असताना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टींसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलीला हवं ते मिळावं म्हणून वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. यामुळे पूजा खेडकर चर्चेत आली होती. त्यात आता तिचे आयएएस पद देखील रद्द करण्यात आले आहे.