शबरीमालाप्रकरणी पुजारी म्हणाले, ‘चर्चा करण्याला काही अर्थ राहिलेला नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 05:49 AM2018-10-08T05:49:56+5:302018-10-08T05:50:22+5:30
शबरीमाला मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांशी (थझामोन तंत्री) चर्चा करण्याच्या केरळ सरकारने दाखविलेल्या तयारीला एका पुजा-याने ‘चर्चा करण्याला काही अर्थ राहिलेला नाही’ अशी भूमिका घेतल्यामुळे फटका बसला.
थिरुवनंतपुरम : शबरीमाला मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांशी (थझामोन तंत्री) चर्चा करण्याच्या केरळ सरकारने दाखविलेल्या तयारीला एका पुजा-याने ‘चर्चा करण्याला काही अर्थ राहिलेला नाही’ अशी भूमिका घेतल्यामुळे फटका बसला. १० ते ५० वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेशाची असलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्याच्या निर्णयावर सरकार व पुजारी यांच्यात चर्चा होणार होती. भगवान आय्यप्पा मंदिराशी संबंधित पंडालम राजघराण्यानेही कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा निर्णय माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने घेतल्याने आता चर्चेला अर्थच नाही, असे म्हटले.
आय्यप्पा मंदिराशी संबंधित अनेक वर्षांची परंपरा, श्रद्धा आणि विधी कायम राखण्यात यावेत या मागणीसाठी भक्तांचे आंदोलन राज्यांत अनेक ठिकाणी सुरू आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी तंत्री कुटुंब आणि पंडालम राजघराण्याच्या सदस्यांना चर्चेसाठी बोलावल्याचे वृत्त होते. तीन तंत्रींपैकी एक कंदारारू मोहनारू आणि पंडालम राजघराण्याच्या कुटुंबाचे सदस्य शशीकुमार वर्मा यांनी आता सरकारशी चर्चा करण्यात काहीही अर्थ राहिलेला नाही. कारण सरकार न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध विचार करायला तयार नाही, असे म्हटले. सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मासिक पाळीच्या वयातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेशाची असलेली बंदी २८ सप्टेंबर रोजी बेकायदा ठरविली होती.
याचिका करणार
अनेक शतके जुन्या परंपरेचा भाग म्हणून या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशाची बंदी होती. न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार व्हावा, अशी याचिका आम्ही करू. याबाबत पंडालम राजघराण्याची भूमिका समजून घेतल्यानंतर आम्ही अधिकाºयांशी चर्चा करू, असे चेंगनूर येथे मोहनारू यांनी सांगितले.