पाटणा - बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये पोलीस आणि प्रशासनाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जबर लाठीमार केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाटणामध्ये विद्यार्थी टीईटी परीक्षा घेण्यासाठी आंदोलन करत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडले. तसेच यादरम्यान, एका अधिकाऱ्याने विद्यार्थ्याला जमिनीवर पाडून त्यांच्यावर लाठीमार केला. विद्यार्थ्याच्या हातामध्ये तिरंगा होता. तो तिथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने हिसकावून घेतला. त्यानंतर एडीएमने त्याला बेदम मारहाण केली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्यासोबत गैरवर्तनही करण्यात आले.
बिहार शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची मागणी करत डाक बंगला चौकामध्ये हे आंदोलन होत होते. संपूर्ण बिहारमधून विद्यार्थी येथे पोहोचले होते. बीटीईटी परीक्षा लवकरच घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभाग सध्यातरी परीक्षा घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांचा लाठीमार करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जमिनीवर पडलेल्या आंदोलकावर लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव के.के. सिंह आहे. ते एडीएम पदावर तैनात आहेत. वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी आंदोलकांना समज देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी दबंगगिरी दाखवत विद्यार्थ्यावर बेछूट लाठीमार केला. या विद्यार्थ्याने तिरंगा घेऊन आपला चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून तिरंगा काढून घेत त्याला मारहाण करण्यात आली.