श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा 78 बसमधून जात होता. त्या दिवशीही रस्त्यावर सामान्य वाहतूक होती. सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला होता, तेव्हा रस्त्याच्या पलीकडून येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनावर आदळली. कार ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला आणि या प्राणघातक हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले.
स्फोट एवढा जोरदार होता की काही काळ सर्वत्र धुळीशिवाय काहीच दिसत नव्हते. धूर दूर होताच तेथील भयावह दृष्य समोर आले. हे दृष्य पाहून संपूर्ण देश त्या दिवशी रडला होता. पुलवामा हल्ल्यात जवानांच्या मृतदेहाचे तुकडे इकडे-तिकडे विखुरलेले गेले होते. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
2500 जवान जैशच्या निशाण्यावर होते
जम्मूतील चेनानी रामा संक्रमण शिबिरातून जवानांचा ताफा श्रीनगरकडे रवाना झाला होता. पहाटे निघालेल्या सैनिकांना सूर्यास्त होण्यापूर्वी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममधील संक्रमण शिबिरात पोहोचायचे होते. हा प्रवास सुमारे 320 किलोमीटरचा होता आणि पहाटे साडेतीन वाजल्यापासून सैनिक प्रवास करत होते. 78 बसेसमध्ये 2500 सैनिकांचा ताफा जम्मूहून निघाला. मात्र पुलवामामध्येच जैशच्या दहशतवाद्यांनी या जवानांना लक्ष्य केले. सैनिकांच्या या ताफ्यातील अनेक सैनिक नुकतीच आपली रजा संपवून कर्तव्यावर परतले होते. जैशला या ताफ्यातील सर्व 2500 सैनिकांना लक्ष्य करायचे होते.
हल्ल्यानंतर सीआरपीएफ अधिकाऱ्याने या हल्ल्याची माहिती दिली होती. ताफ्यात सुमारे 78 बसेस होत्या, पण फक्त एका बसवर हल्ला झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. हा ताफा जम्मूहून श्रीनगरला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे जैश या दहशतवादी संघटनेने टेक्स्ट मेसेज पाठवून हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. जैशने काश्मीरची वृत्तसंस्था जीएनएसला हा संदेश पाठवला होता.
जैशने रत्नीपोरा चकमकीचा बदला घेतला
पुलवामामधील अवंतीपोरा येथून सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारी बस जात असताना, त्याचवेळी एका कारची बसला धडक बसली. ही कार आधीच हायवेवर उभी होती. बस येथे पोहोचताच मोठा स्फोट झाला. हल्ला झालेल्या ठिकाणापासून श्रीनगरचे अंतर जेमतेम 33 किलोमीटर होते. हा हल्ला जैशचा बदला मानला जात होता. कारण हल्ल्याच्या दोन दिवस आधीच पुलवामाच्या रत्नीपोरा भागात सुरक्षा दलांनी एका चकमकीत जैशचा एक दहशतवादी मारला होता. पण, भारतानेही या हल्ल्याचो जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्याच्या काही दिवसांतच भारताने पाकिस्तामध्ये घुसून बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक केली होती. त्या दिवशी जैशचा ठिकाणी हल्ला करुन भारताने 300 पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले होते.