नवी दिल्ली : पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, ए. के. अॅन्टोनी हेही उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, भारतीय लष्कर, नागरिकांवर होणारे दहशतवादीहल्ले हे अतिशय घृणास्पद कृत्य आहे. या देशात फूट पाडण्याचा दहशतवाद्यांचा इरादा आहे. त्यासाठी त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी हे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. दहशतवाद्यांनी आजवर केलेले हल्ले जनता कधीच विसरणार नाही.कारवाईसाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचे केंद्राने जाहीर केले आहे. त्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सारा देश शोकसागरात बुडालेला आहे. अशा वेळी लष्कर व केंद्र सरकारच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा वेळी त्यांच्यासोबत असणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, ते आम्ही पार पाडत आहोत. या हल्ल्यासंदर्भातील इतर पैलूंवर काँग्रेस पक्ष येत्या काही दिवसांत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. पुलवामा हल्ला करणाऱ्यांना मुँहतोड जवाब देण्याची मागणी काही राजकीय नेत्यांनी केली आहे. त्याविषयी राहुल गांधी म्हणाले की, मी या गोष्टीबाबत काहीच प्रतिक्रिया देणार नाही. हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक व्यथित झाला आहे. संतापला आहे.कठोरपणे मुकाबला हवा : मनमोहन सिंगमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, दहशतवादी कृत्यांचा कठोरपणेच मुकाबला केला पाहिजे. त्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. देशाचे ऐक्य कायम राखले पाहिजे. गुलाम नबी आझाद म्हणाले की, पुलवामामधील घातपात हा देशावर झालेला हल्ला आहे.
Pulwama Attack: सर्व विरोधी पक्ष लष्कर,केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 5:30 AM