नवी दिल्ली - भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी वादग्रस्त विधान करुन नवीन वादाला आमंत्रण दिले आहे. टेनिसपटू सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदावर हटवा, अशी मागणी राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. सोबत त्यांनी सानिया मिर्झाचा 'पाकिस्तानची सून' असा उल्लेखही केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने सानिया मिर्झाचे ब्रँड अॅम्बेसिडर पद काढून घ्यावे, अशी मागणी राजा सिंह यांनी केली आहे. राजा सिंह हे तेलंगणा विधानसभेत भाजपाचे एकमेव आमदार आहेत.
राजा सिंह यांनी म्हटले आहे की, ''सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदावर हटवण्यात आले. सानियाऐवजी सायना नेहवाल अथवा पी.व्ही. सिंधूसारख्या खेळाडूंना ब्रँड अॅम्बेसिडर पद देण्यात यावे''. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी जुलै 2014मध्ये सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी नेमले होते. पण भाजपा सुरुवातीपासूनच सानिया मिर्झाच्या नावाला विरोध करत आला आहे.
...सानिया मिर्झानं खडसावले
दरम्यान, टेनिसपटू सानिया मिर्झाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहली. यावरुन नेटिझन्सकडून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. यानंतर सानियाने चांगल्याच शब्दांत टीका करणाऱ्या नेटकऱ्यांचा समाचार घेतला. सानियाने म्हटले की,''सेलेब्रिटींना त्यांची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी कोणत्याही हल्ल्यानंतर ट्विट किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे गरजेचे आहे, असे अनेकांना वाटते. त्याने सेलिब्रिटींच्या मनात देशाप्रती प्रेम आहे की नाही, हे सिद्ध होते, असाच अनेकांचा समज असतो. पण, सेलेब्रिटींवर टीका करणाऱ्या व्यक्ती या स्वतः नैराश्याने ग्रासलेल्या असतात आणि राग व्यक्त करण्यासाठी त्यांना कोण भेटत नाही. त्यामुळे ते सेलेब्रिटींना लक्ष्य करून द्वेष पसरवतात. मी आपल्या देशासाठी खेळते. याद्वारे मी आपल्या देशाची सेवा करतो'', अशा शब्दांत तिनं टीका करणाऱ्यांना खडसावले आहे. सीआरपीएफचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे, असेही तिनं ट्विटमध्ये म्हटले आहे.