ठळक मुद्देकाश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची शुक्रवारी (15 फेब्रुवारी) सकाळी बैठक होणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असून सिंह हे शुक्रवारी घटनास्थळाला भेट देणार आहेत. वरिष्ठ सुरक्षा आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कृतीबाबत आढावा घेतील.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची शुक्रवारी (15 फेब्रुवारी) सकाळी बैठक होणार आहे. त्यात काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असून सिंह हे शुक्रवारी घटनास्थळाला भेट देणार आहेत. तसेच वरिष्ठ सुरक्षा आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कृतीबाबत आढावा घेतील. सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यामुळे राजनाथ सिंह यांनी बिहारमधील शुक्रवारचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.
दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तर, मोदीजी पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक हवाय, अशी मागणीही अनेकजण करत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही या हल्लाचा निषेध व्यक्त करताना, आता निषेध व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याचे म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी देश उभा असल्याचे म्हटले. तसेच, जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावार पाकिस्तान पुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल. संपूर्ण भारताला हादरवून टाकणाऱ्या या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जे काही करावे लागेल ते निश्चितच केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समस्त भारतीयांना दिली. हा पाकिस्तान आश्रित आणि पुरस्कृत हल्ला आहे. अशा दहशतवादी हल्ल्याने शांततेला सुरुंग लावू पाहणाऱ्यांचा डाव कणखरपणे उधळून लावण्यात सरकार कटीबद्ध आहे, अशी हमी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीयांना दिली.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, राज्यपाल सत्यपाल मलिक तसेच माजी संरक्षणमंत्री शरद पवार व मुलायम सिंह यादव, योगी आदित्यनाथ यांनीही हल्ल्याचा धिक्कार केला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केला. पण त्यातून पाकला धडा मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता कायमस्वरूपी अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली एक घाव घालून पाकचे जे दोन तुकडे केले होते, तशीच कारवाई भारताने करायला हवी, अशीच चर्चा सुरू आहे.