नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू अडचणीत सापडले. भाजपानं सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली. आता या टीकेला सिद्धूंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे सिद्धू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी, अशा शब्दांमध्ये सिद्धूंनी मोदी आणि भाजपाला लक्ष्य केलं. या ट्विटमध्ये त्यांनी चार फोटो जोडले आहेत. यात त्यांनी मोदींना टॅगदेखील केलं आहे. तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही, असं सिद्धूंनी म्हटलं आहे. 'पीएम साहब आप का डायलॉग खुद्दारी, किसी और का डायलॉग गद्दारी, सत्य पड़ेगा तुमपे भारी', असं नवजोत सिंग सिद्धूंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांचे दोन फोटो वापरण्यात आले आहेत. यातील एक फोटो इम्रान खान यांच्यासोबतचा आहेत. तर दुसऱ्या फोटोत मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत दिसत आहेत. 25 डिसेंबर 2015 रोजी मोदी अचानक लाहोरला गेले होते. त्यावेळी काढण्यात आलेला फोटो सिद्धू यांनी ट्विट केला आहे. दुसऱ्या फोटोत सिद्धू यांनी वर्तमानपत्रातील दोन बातम्यांची कात्रणं शेअर केली आहे. भारत, सौदी अरेबिया पाकिस्तानसोबत अनुकूल वातावरणात चर्चा करणार, सौदीकडून दहशतवादाला निषेध; पण पाकिस्तानबद्दल मौन अशा दोन बातम्या त्यांनी ट्विट केल्या आहेत. तिसऱ्या फोटोत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत दिसत आहेत. कौर अकाली दलाच्या नेत्या आहेत. अकाली दल भाजपाचा मित्रपक्ष आहे. तर चौथा फोटो जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरच्या सुटकेशी संबंधित आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कंदाहार विमान अपघात प्रकरण घडलं. त्यावेळी वाजपेयी सरकारनं अजहरची सुटका केली होती.