जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांना आलेलं वीरमरण देशवासीयांना चटका लावून गेलंय. त्यांच्या हौतात्म्याला अख्खा देश सलाम करतोय. श्रद्धांजली सभांमध्ये नागरिक या वीरपुत्रांपुढे नतमस्तक होताहेत. अशीच एक श्रद्धांजली सभा उत्तराखंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आयोजित केली होती. परंतु, तिथे जे घडलं, ते अस्वस्थ करणारं, चीड आणणारं आहे. या श्रद्धांजली सभेत, माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे चिरंजीव वीरेंद्र रावत यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पैसे उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळलीय.
श्रद्धांजली सभेत संगीत सादर करणारे कलाकार स्टेजवर आहेत. या स्टेजच्या समोरच वीरेंद्र रावत उभे राहतात, एक तरुण येऊन त्यांच्यावर नोटा उधळतो. ते हसत हसत हे सगळं एन्जॉय करतात, नंतर टाळ्याही वाजवतात. थोड्या वेळाने पुन्हा ते पुढे येतात, तरुण त्यांच्यावर नोटा उधळतो. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची रेषही दिसत नाही. उलट, या नोटांच्या उधळपट्टीनंतर फोटोसेशनही झाल्याचं व्हिडीओत दिसतं. एएनआय या वृत्तसंस्थेनं हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
या श्रद्धांजली सभेनंतर वीरेंद्र रावत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली होती. ५६ इंच छातीवाल्या सिंहाला जागं करण्याचा हा प्रश्न होता, शत्रूला हिसका दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कठोर कारवाई करायला हवी, असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. परंतु, श्रद्धांजली सभेत ते स्वतः काय करत होते, हे आता समोर आल्यानं त्यांची चांगलीच पंचाईत होऊ शकते.