श्रीनगर: काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत. जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यातील बसला अवंतीपुरामध्ये दहशतवाद्यांच्या वाहनानं धडक दिली. या वाहनात जवळपास 200 किलो स्फोटकं होती. गुप्तचर यंत्रणांनी सात दिवस आधीच याबद्दलचा अलर्ट जारी केला होता. काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला होऊ शकतो, जवानांच्या ताफ्यावर आयईडीच्या मदतीनं पुलवामात दहशतवादी हल्ला करु शकतात, असा अलर्ट देण्यात आला होता. संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरुच्या फाशीला सहा वर्षे पूर्ण होत असल्यानं दहशतवाद्यांकडून हल्ला घडवला जाऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना गुप्तचर विभागानं दिल्या होत्या. याशिवाय जेकेएलएफचा संस्थापक मोहम्मद मकबूल भट्टच्या फाशीला 35 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हल्ला घडवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 8 फेब्रुवारीला याबद्दलचा अलर्ट जारी करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी हल्ल्याची संपूर्ण योजना आखल्याची माहिती यामधून देण्यात आली होती. सीआरपीएफच्या किंवा पोलिसांच्या तळांवर दहशतवादी मोठा हल्ला घडवू शकतात, असा स्पष्ट अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या. ज्या भागात सुरक्षेसाठी जात आहात, तिथल्या परिस्थितीचा आधी संपूर्ण आढावा घ्या, असं अलर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही सुरक्षा दलांकडून चूक झाली आणि दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका गाडीत स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफचा ताफा या रस्त्यावरुन जाऊ लागताच ही गाडी त्या ताफ्यावर जाऊन धडकली आणि मोठा स्फोट झाला.
Pulwama Attack: ...तर अनर्थ घडलाच नसता; वाचले असते जवानांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 7:58 PM