नवी दिल्लीः पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या एका जवानाच्या पत्नीचा सासरची मंडळी छळ करत असल्याचं उघड झालं आहे. कर्नाटकात शहीद एच. गुरू यांची पत्नी कलावती(25)वर दिराशी लग्न करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्या शहिदाच्या पत्नीनं केला आहे. शहीद होऊन 13 दिवस पतीला झाले नाहीत, तोच तिचं दिराशी दुसरं लग्न लावण्यासाठी सासरची मंडळी निघाली आहेत. 14 फेब्रुवारीला पुलवामा सीआरपीएफच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 40 जवानांना वीरमरण आलं होतं. ज्यात कर्नाटकातील एच. गुरू यांचाही समावेश होता.
मांड्यातील रहिवासी असलेली शहिदाची पत्नी कलावतीवर दिराशी लग्न करण्यासाठी सासरची मंडळी दबाव टाकत आहेत. कलावतीला सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा आणि भरपाईमुळेच सासरची मंडळी दिराशी लग्न करण्यास सांगत असल्याचंही कलावती म्हणाल्या आहेत. कलावती यांनी मांड्या पोलिसांकडे मदतही मागितली आहे. पोलिसांनी त्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला आहे.पोलिसांत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलीस म्हणाले आहेत. वरिष्ठ पोलिसांनी सासरच्या मंडळींना तंबी दिली आहे. हा घरगुती वाद असून, तो घरातच सोडवा, असा सल्लाही पोलिसांनी एच. गुरूच्या कुटुंबीयांना दिल्याचं समजत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही महिलेला न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं आहे.