नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही 'प्राइम टाइम मिनिस्टर' तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून मोदींवर टीका केली आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती मिळल्यानंतरही तीन तास प्राइम टाइम मिनिस्टर शूटिंगमध्ये व्यस्त होते असे हिंदीमध्ये ट्वीट केले आहे. 'पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत होत्या, शहीद जवानांच्या घरातील स्थितीही वेगळी नव्हती. असे असताना मोदी मात्र पाण्यामध्ये हसत शूटींग करीत होते, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच PhotoShootSarkar हा हॅशटॅग वापरला आहे.
'जवानांवर हल्ला झाल्यानंतरही मोदी शूटिंगमध्ये बिझी होते'
जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्याच्या सात दिवसांनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला होता. 14 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशातील 40 जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी कॉर्बेट पार्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होते. जगात असा कुठला पंतप्रधान असेल का?, असा प्रश्नही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला होता. पुलवामा हल्ला 3 वाजून 10 मिनिटांनी झाला आणि मोदी संध्याकाळी 6.10 वाजता शूटिंगमध्ये बिझी होते. तर दुसरीकडे देश छिन्नविछिन्न शहिदांच्या मृतदेहांकडे पाहत होता. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चुली बंद होत्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधल्या रामनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये चहा-नाश्ता करत होते. जगातल्या कोणत्याही देशाला क्वचितच असा पंतप्रधान लाभला असावा. भारताचे पंतप्रधान पुलवामा हल्ल्याच्या चार तासांनंतरही वनविहार करण्यात व्यस्त होते. जवानांवर हल्ला झाला, त्यानंतरही त्यांचं तीन तास शूटिंग सुरू होते. पुलवामा हल्ल्यानंतरही मोदींच्या सभा थांबल्या नाहीत असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं होतं.