काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर नेटकऱ्यांमधून हल्ल्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. याचे फटकारे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसू लागले आहेत. युपीए सरकारच्या काळात शहीद हेमराज यांचे मुंडके कापून नेणाऱ्या पाकड्यांच्या कृत्यावर व दहशतवादी कारवायांवर नरेंद्र मोदी यांनी विचारलेले जाब आता बुमरँग झाले आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी दिलेल्या मुलाखती, भाषणांचे व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. याला मोदी कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
गेल्या 70 वर्षांत काय केले? भ्रष्टाचारासह दहशतवाद हाही मुद्दा मोदींनी तेव्हा उचलला होता. देशभावना तीव्र असल्याने जनतेलाही हा मुद्दा भावला होता. या काळात मोदींनी काँग्रेस सरकारला विचारलेले प्रश्न आता त्यांच्यावरच उलटले आहेत. मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाच प्रश्न विचारले होते. मोदींचे याच प्रश्नांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून लोकच त्यांना प्रश्न विचारू लागले आहेत. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात मोदींना या प्रश्नांची उत्तरे सापडली का? जर सापडले असतील तर एवढा मोठा आत्मघाती हल्ला कसा झाला, असे प्रश्न लोकांनी विचारले आहेत.
काय होते मोदी यांचे प्रश्न....
- दहशतवादी आणि नक्षलवाद्यांकडे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा येतो कुठून?
- परदेशातून दहशतवाद्यांना रसद मिळते. यंत्रणा तुमची असताना ही रसद तोडत का नाही?
- दहशतवादी देशात घुसून कारवाया करतात. तीन्ही दले कार्यरत असताना घुसखोरी होतेच कशी?
- दहशतवाद्यांच्या नेटवर्कची माहिती कशी मिळत नाही?
- परदेशात पळून गेलेले आतंकवादी प्रत्यार्पणाच्या माध्यमातून भारतात आणले जाऊ शकतात. त्यांना का आणलं जात नाही? याबाबत तुमचं धोरण काय आहे?
मोदी यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ...