नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज (18 फेब्रुवारी) देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये अनेक राज्ये सहभागी झाल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने दिली आहे. तसेच घाऊक बाजारपेठाही बंद राहणार आहेत.
व्यापारी महासंघातर्फे ठिकठिकाणी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी पाकिस्तान आणि चीनच्या प्रतिकात्मक वस्तूंचे दहन करण्यात येणार आहे. व्यापारी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत जमा करतील व ती थेट या कुटुंबीयांना दिली जाईल अशी माहिती महासंघाचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा, जम्मू आणि काश्मीरसह अनेक राज्ये या बंदमध्ये सहभागी आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारीलाच गुप्तचर संस्थांकडून पुलवामा IED हल्ल्या होण्यासंदर्भात अॅलर्ट जारी केला होता. यासाठी योग्य ती सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले होते. परिसराची योग्य रितीने तपासणी केल्याशिवाय जवानांचा ताफा पुढील मार्गाच्या दिशेने जाऊ देऊ नका, अशी स्पष्ट सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती. पण, दुर्दैवानं या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या पत्रकात 9 फेब्रुवारीचा दिवस सर्वांधिक धोकादायक असल्याचाही इशारा देण्यात आला होता. विशेषतः पहाटेच्या सुमारास हल्ला होईल, अशी सूचना जारी करण्यात आली होती. पण बर्फवृष्टी आणि दुरुस्तीच्या कामांमुळे गेले चार दिवस हा राजमार्ग बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, हा मार्ग सुरू झाल्यावर नेहमीच्या तुलनेत जास्त वाहने आणि जवान पाठविण्यात आले. मार्ग मोकळा केल्यानंतर 14 फेब्रुवारीला सीआरपीएफचे जवान 70हून अधिक वाहनांमधून पुलवामा येथे जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने प्रवास करताना दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.