लखनौ - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. तर सीमेवरही लष्कराकडून मोठी कारवाई करत दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर, उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने दोन काश्मिरी तरुणांनी अटक केली होती. या दोन्ही तरुणांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी आपला संबंध असल्याची कुबली दिली आहे. एटीएसने शहारनपूर येथील देऊबंद शहरातून या दोघांना अटक केली होती. या तरुणांनी पुलवामा हल्ल्यांसदर्भात माहिती दिली असून अद्याप खोलवर तपास सुरू आहे
व्हॅलेंटाईन डे दिवशी 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांची कार स्फोटकाने उडवली. या भ्याड हल्ल्यात देशातील 39 जवान शहीद झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 3 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेने देश हळलला असून तीव्र शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा जशास तशा रितीने उत्तर दिले जाईल, असे म्हणत पाकिस्तानला ठणकावले होते. तर, हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सुरक्षा जवानांनी या हल्ल्यातील म्होरक्या अब्दुल रशीद गाझीला ठार केले. मात्र, या हल्ल्यासंदर्भात सुगावे आणि धागे दोरे शोधण्याचा तपास सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाकडून दोन काश्मिरी तरुणांना अटक करण्यात आली होती. शाहनवाज आणि अब्दुल मलिक अशी या अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी दोन्ही आरोपी तरुणांची चौकशी केली असता, आपले जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचं त्यांनी कबूल केलं. ओ पी सिंह यांनी तब्बल चार तास या तरुणांची चौकशी केली. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांना ही माहिती देण्यात आली. या माहितीच्या आधारे भविष्यातील कट कारस्थानासंदर्भातील अजून काही गोष्टी हाती लागण्याची शक्यता आहे, असं ओ पी सिंह यांनी सांगितलं आहे. देवबंद येथून या दोन संशयित तरुणांना अटक केल्यानंतर लखनौ एटीएस न्यायलयाने या दोघांनाही 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते. या चौकशीदरम्यान, पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. यातील शानवाज अहमद तेली हा जम्मू आणि काश्मीरच्या कुलमागचा रहिवासी असून अक्युब अहमद मलिक हा पुलवामाचा स्थानिक रहिवासी आहे.
दरम्यान, या अगोदरही पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतीपुरा जिल्ह्यांतील असून, त्यांच्यावर पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याचा संशय आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेचे 40 जवान शहीद झालेत. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले.