नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामामध्ये सुरक्षा जवानांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी निषेध नोंदवला आहे. भारतातील जवानांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले आहेत. तसेच दहशतवादविरोधातल्या लढाईत रशिया नेहमीच भारताबरोबर असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांवर झालेल्या हल्ल्याबाबत आम्ही दुःख व्यक्त करतो, आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवतो. या हल्ल्यातील सूत्रधारांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, माझा भारताला नेहमीच पाठिंबा असेल, तसेच दहशतवादविरोधातील मोहीम आता आम्ही आणखी तीव्र करणार आहोत. आमचा मित्र राष्ट्र असलेल्या भारतीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो, असंही पुतिन म्हणाले आहेत.तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतातील जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, पाकिस्ताननं दहशतवादी गटांना सहकार्य करणं बंद करावं. पाकिस्तानच्या जमिनीवरून दहशतवादी हालचाली तात्काळ थांबल्या पाहिजेत. पाकिस्तानमधून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळेच अव्यवस्था, हिंसा आणि दहशतवाद वाढीस लागला आहे. या हल्ल्यात अमेरिका भारताबरोबर आहे. तसेच भारतातल्या शहिदांच्या कुटुंबीयांप्रति आम्ही दुःख व्यक्त करत असल्याचं अमेरिकेनं सांगितलं आहे.
"रशिया भारताबरोबरच, मोदींनी कारवाई करावी", अमेरिकेपाठोपाठ पुतिन यांचा मोदींना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 9:17 PM