नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सीआरपीएफनेही आपल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच शहिदांना दिलेलं वचन पूर्ण करत सलाम केला आहे.
गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... असं म्हणत CRPF ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये 'तुमच्या शौर्याचं गीत कर्कश गोंधळात हरवलं नाही. अभिमान इतका होता की रडलो नाही. आम्ही विसरलो नाही आणि आम्ही माफ केलं नाही. पुलवामामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या आमच्या बांधवांना आमचा सलाम. आम्ही त्याच्या कुटुंबियांसमवेत खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे आहोत' असं ट्विट सीआरपीएफने केलं आहे.
सीआरपीएफने गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर एक ट्विट केलं होतं. 'आम्ही विसरणार नाही, आम्ही माफ करणार नाही. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करतो आणि आपल्या शहीद बांधवांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही उभे आहोत. या भयंकर हल्ल्याचा बदला घेतला जाईल' असं ट्विटमध्ये म्हटलं होतं.
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. गृह मंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल
Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य
मोदीजी, तुमचं गिफ्ट घेऊन जा; व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शाहीन बागेची पंतप्रधानांना साद