नवी दिल्ली - जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. गृह मंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट केलं आहे.
गृह मंत्री अमित शहा यांनी 'मी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या मातृभूमीच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या देशाच्या वीरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा भारत नेहमीच आभारी राहील' असं ट्विट केलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी '2019 च्या भ्याड पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांचं स्मरण करतो. भारत कधीही त्यांचं बलिदान विसरणार नाही. संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे आणि आमची ही लढाई सुरूच राहील' असं म्हटलं आहे.
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य
मोदीजी, तुमचं गिफ्ट घेऊन जा; व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शाहीन बागेची पंतप्रधानांना साद
उमेदवारी देताय? आधी गुन्ह्यांचे तपशील जाहीर करा!
निर्भया : चौघांचे नवे ‘डेथ वॉरन्ट’ पुन्हा लांबणीवर