श्रीनगर: पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशीदला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र या कारवाईत लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्सच्या मेजरसह 4 जवान शहीद झाले. या कारवाईदरम्यान स्थानिकांकडून दगडफेक सुरू होती. त्यामुळे पोलीस आणि लष्कराला दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागला. मात्र तरीही त्यांनी स्थानिकांची काळजी घेतली. या कारवाईदरम्यानच्या व्हिडीओतून ही काळजी अगदी स्पष्टपणे दिसून आली. समोर दहशतवाद्यांचं आव्हान असताना, जीवाला धोका असताना पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना मागे हटण्याचं आवाहन अतिशय विनम्रपणे केलं.
दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना काही स्थानिक तरुणांनी आंदोलन सुरू केलं. त्यांनी पोलीस आणि जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पुलवामा पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं त्यांना अतिशय नम्रपणे शांत राहण्याचं आणि तिथून मागे हटण्याचं आवाहन केलं. 'मी पुलवामा पोलिसांच्या वतीनं तुमच्याशी संवाद साधतोय. तुमचा आमचा जीव आमच्यासाठी मोलाचा आहे, हे कृपया तुम्ही लक्षात घ्या,' अशा शब्दांमध्ये अगदी मृदू भाषेत पोलीस कर्मचाऱ्यानं दगडफेक करणाऱ्या तरुणांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
'तुम्ही तरुण आहात. तुमचं खूप आयुष्य शिल्लक आहे. तुम्ही मेहरबानी करुन मागे जा. आमची कारवाई सुरू आहे. रस्ता अद्याप खुला झालेला नाही. तुमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे कृपया परत जा. मी मोठ्या भावाच्या नात्यानं तुम्हाला सांगतोय. तुम्ही शांत राहा. मागे व्हा. तुमचं कुटुंब तुमची वाट पाहतंय,' असं अतिशय नम्र आवाहन पोलीस कर्मचाऱ्यानं दगडफेक करणाऱ्यांना केलं. या आवाहनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत.
पुलवामातील एन्काऊंटरमध्ये एक मेजर आणि चार जवान शहीद झाले. याशिवाय एका स्थानिक तरुणाचाही कारवाई दरम्यान मृत्यू झाला. रविवारी रात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरू होता. गुप्तचर विभागानं दिलेल्या सूचनांनंतर सुरक्षा दलांनी पुलवामात कारवाई केली. या कारवाई दरम्यान काही घरांना सुरक्षा दलांनी घेराव घेतला. राष्ट्रीय रायफल्स, राज्य पोलिसांचा विशेष कारवाई विभाग, केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी ही संयुक्त कारवाई केली.