अजमेर : जम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. देशातील प्रत्येक नागरिक अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे. या हल्ल्याचा बदला घ्या, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करा, अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत. जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना पोसणाऱ्या पाकिस्तानचाही सोक्षमोक्ष लावण्याची मागणी होत आहे. या भावना लक्षात घेऊन, केंद्र सरकारने ठोस पावलं उचलली असतानाच, राजस्थानातील अजमेर दर्ग्याची दारं पाकिस्तानी नागरिकांसाठी बंद करावीत, अशी सूचना दर्ग्याच्या प्रमुख दिवाणांनीच केली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ला हा इस्लामविरोधी आहे. त्यामुळे दरवर्षी पाकिस्तानातून अजमेर दर्ग्यात येणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंवर निर्बंध आणावेत, अशी मागणी सैय्यद जैन उल आबदिन यांनी केंद्राला केली. सर्व देशांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर बंदी आणावी, असंही त्यांनी नमूद केलं. सरकारने शहिदांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत करावी, म्हणजे त्यांची मुलं शिकू शकतील, तसंच त्यांना सरकारी नोकरीही द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सुमारे 2500 जवान सुटी संपवून गुरुवारी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी जात असताना, त्यांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. जैश-ए-मोहम्मद या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि हा हल्ला घटवून आणणाऱ्या आदिल अहमद या क्रूरकर्म्याचा फोटोही जारी केला होता. या हल्ल्यात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे अनेक राज्यांमधील 40 जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांनाही या हल्ल्यात वीरमरण आलं आहे.