पुलवामा दहशतवादी हल्ल्यानं देश हादरला आहे. सीआरपीएफचे ३७ जवान शहीद झाल्यानं सगळेच हळहळलेत. केंद्र सरकारने जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानचा बदला घ्यावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र त्याचवेळी, गुप्तचर यंत्रणेकडून 'हाय अॅलर्ट' आला असतानाही, सुरक्षा यंत्रणा इतकी गाफील का आणि कशी राहिली?, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. अडीच हजार जवानांचा ताफा येत असताना यंत्रणा सतर्क का नव्हती?, स्फोटकांनी भरलेली गाडी या रस्त्यावर आलीच कशी?, असे प्रश्नही विचारले जाताहेत. त्या संदर्भातील खुलासा एका अधिकाऱ्यानं टाइम्स ऑफ इंडियाकडे केला आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानुसार, सीआरपीएफचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणं घातक ठरलं, अशी माहिती सीआरपीएफचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) कश्मीर जुल्फिकार हसन यांनी दिली. रोड ओपनिंग पार्टीने गुरुवारी सकाळी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली होती. या मार्गावर कुठेही स्फोटकं सापडली नव्हती. तसंच, जवानांच्या ताफ्यावर गोळीबार होऊ नये, हँड ग्रेनेड फेकली जाऊ नयेत, यादृष्टीनेही पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु, काश्मिरी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामार्गाच्या एका भागातून त्यांच्या गाड्या नेण्यास संमती देण्यात आली होती. या सोयीचा (गैर)फायदा घेत जैश-ए-मोहम्मदचा आत्मघाती दहशतवादी आदिल अहमद सर्व्हिस रोडवरून राजमार्गावर आला आणि अघटित घडलं, याकडे हसन यांनी लक्ष वेधलं. अशा प्रकारचा हल्ला याआधी झाला नव्हता, पण यापुढे आम्ही आमची रणनीती बदलू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
वाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे.असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली.