पुलवामा - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे (Pulwama Terror attack) केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्यातील सुपुत्र शहीद झाला आहे. नितीन राठोड असे शहीद जवानाचे नाव आहे. भ्याड हल्ल्यात राठोड शहीद झाल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या मूळ गावामध्ये शोककळा पसरली आहे. नितीन राठोड हे लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावातील रहिवासी होते. संतप्त गावकऱ्यांकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे.
या भ्याड हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या उरीप्रमाणेच या हल्ल्याचाही बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. लष्कराने त्या हल्ल्याला मिशन 'सर्जिकल स्ट्राईक' हे नाव दिले होते. या मिशनअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर, भारतीय सैन्याची ताकत जगभरातील देशांनी अनुभवली. त्यामुळे, आताही उरीप्रमाणेच अवंतीपुरा हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावना नेटीझन्स व्यक्त करत आहेत. तर, आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होऊन जाऊ द्या, अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली जात आहे. ट्विटर आणि फेसबुकवरुन नेटीझन्स या 'हल्ल्याचा बदला हीच शहीदांना श्रद्धांजली' असल्याचं म्हणत आहेत.भारतीय लष्करावर सर्वांत मोठा हल्लादरम्यान, पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी)जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या.
तालिबानी स्टाईलचा हल्लावाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे. असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली. 192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
काय होता गुप्तचरांचा अॅलर्ट?या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अॅलर्ट राहावे.