पुण्यामधील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, या प्रकरणात भरधाव कार चालवून दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘बाळा’ची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. तर आरोपी ‘बाळा’ला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेले त्याचे वडील आणि आजोबा यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अल्पवयीन ‘बाळा’ला मद्य देणाऱ्या बारच्या संचालकांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, अपघात घडला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातावेळी तिथे उपस्थित असलेल्या अमीन शेख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अपघात घडला तेव्हा मी १० फूट अंतरावरून रस्ता पार करत होतो. अपघातात दोन जणांना चिरडल्यानंतर त्या ‘बाळा’ला जमाव पकडून मारहाण करत होता. तर हा ‘बाळ’ हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका, मी हवे तेवढे पैसे आणून देतो, असं ओरडत होता.
दरम्यान, हा दावा करणारे अमीन शेख हे अपघातस्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही दिसत आहेत. ते रस्ता पार करून जातात आणि काही सेकंदांच्या अवधीने पोर्श कार तिथून भरधाव वेगात आली आणि दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण तरुणीला धडक दिली. त्यात त्या तरुण तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी ‘बाळा’ला जमावाने पकडून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.