नवी दिल्ली - भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान आझाद यांच्या मुंबईसह महाराष्ट्रात सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 30 डिसेंबरला पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी कोरेगाव-भीमा येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले होते. या पार्श्वभूमीवर, भीमा कोरेगाव संघर्ष महासभेत चंद्रशेखर आझाद काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आझाद यांना ऐकण्यासाठी राज्यातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने मुंबईतील सभेला येईल, असा दावा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केला आहे.
(भीमा काेरेगाव क्रांती दिनानिमित्त 'रावण' पुण्यात)
तर दुसरीकडे, ''महाराष्ट्र ही आमच्यासाठी पूजनीय भूमी आहे आणि भीमा-कोरेगाव आमच्यासाठी तीर्थस्थळ'', असे चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रशेखर म्हणाले की, 30 डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभेसाठी जे स्थळ निश्चित करण्यात आले आहे, तेथेच जाहीर सभा होणार. पण यादरम्यान येथील वातावरण खराब होऊ नये, ही पूर्णतः सरकारची जबाबदारी आहे''.
(चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर)
बहुजन समाजासाठी भीम आर्मी संघटनेची स्थापना केली आहे. बहुजन समाजाच्या सुरक्षेसाठी आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही संघटना स्थापण्यात आली आहे, असेही यावेळेस आझाद यांनी सांगितले.
'बहुजन समाजाचं सरकार व्हावं'
शिवाय, आम्हाला काँग्रेस किंवा भाजपाचं सरकार नकोय. आम्हाला बहुजनांचं सरकार हवे आहे. यासाठी सर्व बहुजन संघटनांनी एकत्र यायला हवे, असं मतंही आझाद यांनी मांडलं आहे.
दरम्यान, मजबूत भारत बनवण्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होते. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, हाच उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्र दौरा
29 डिसेंबर 2018 - मुंबईत दादर चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार, संध्याकाळी 4 वाजता वरळीतील जांबोरी मैदान येथील महाराष्ट्र भीम आर्मी आयोजित पहिल्या आंबेडकरी जनचेतना सभेला मार्गदर्शन 30 डिसेंबर 2018 - पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन 31 डिसेंबर 2018 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद आंबेडकरी तरुणाईशी या कार्यक्रमाचे आयोजन, अॅड. चंद्रशेखर आझाद साधणार संवाद साधणार 1 जानेवारी 2019 - भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभास अभिवादन करुन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विजय स्तंभावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. 2 जानेवारी 2019 - लातूरमध्ये जाहीर सभा4 जानेवारी 2019 - अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जाहीर सभा
कोण आहे चंद्रशेखर आझाद?तीन वर्षांपूर्वी अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी भीम आर्मीची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कामे केली आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील जातीय हिंसाचाराच्या घटनेमुळे तेथील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली. सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून दीड महिनाभरापूर्वी सहारनपुर कारागृहातून मुक्तता झाली. मात्र आझाद हे कारागृहात असतानाच आता देशातील दलित बहुजनांचा आक्रमक नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील तरुण या संघटनेकडे आकृष्ट झाला आणि भीम आर्मी मागील दीड वर्षात देशभरात वाढली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भाजपाला सत्तेतून बाहेर करण्याची घोषणा आझाद यांनी केली होती.
1 जानेवारी 1818 मधील लढाइंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने मोठी कामगिरी बजावली होती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला हाेता. यंदा या लढाईला 201 वर्षे पूर्ण हाेणार आहेत. भीमा कोरेगाव येथे या लढाईत हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी लाखो आंबेडकरी जनता या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असते. 2018 वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.