पुणे हे भारताचे डेट्रॉईट
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी : संरक्षणविषयक अभ्यासक्रम सुरू व्हावेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी : संरक्षणविषयक अभ्यासक्रम सुरू व्हावेतपुणे : अभियांत्रिकीच्या संधी तसेच औद्योगिकीकरणामुळे भारताचे पुणे शहर हे भारताचे डेट्रॉईट (अमेरिकेतील औद्योगिक शहर) म्हणून उदयास येत आहे, असे गौरोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.चाकण एमआयडीसी फेज २ मधील जनरल इलेक्ट्रॉनिक्सच्या नवीन ब्रिलियंट फॅक्टरीचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जीईचे उपाध्यक्ष जॉन जी. राईस, जीईचे दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष वनमाळी अगरवाल उपस्थित होते. मोदी म्हणाले, भारतात औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच सरंक्षण क्षेत्रातील उद्योग विकसित करण्याची क्षमता आहे. यासाठी लागणारी सामग्री देशात उपलब्ध आहे. आज भारत जगातील शस्त्र खरेदी करणारा देश असला, तरी देशांतर्गत शस्त्रास्त्र उद्योगाला चालना दिल्यास कमी किमतीत शस्त्रनिर्मिती करून तिसर्या जगातील देशांना त्यांची विक्री करता येणे शक्य आहे. यासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी संरक्षणविषयक अभ्यासक्रम आवश्यक आहेत. खासगी उद्योगांना यात समाविष्ट करण्यासाठी या क्षेत्रात ४९ टक्के गुंतवणूक करण्याला परवानगी देण्यात आली आहे. देशाने केलेल्या प्रगतीमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जल, जमीन, तसेच नभ या क्षेत्रांतील उद्योग विकसित करण्यासाठी मोठ्या संधी आहेत. देशाला लाभलेल्या विस्तीर्ण सागरी किनार्यामुळे जहाजबांधणी उद्योगातही गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. या उद्योगाला चालना मिळाल्यास, या परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. (प्रतिनिधी)................महाराष्ट्राचा इतरांनी आदर्श घ्यावा एकेकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महांमडळातील लालफितीच्या कारभारामुळे १०० ते १२० प्रकप्ल प्रलंबित राहत होते. मंजुरीसाठी चार-चार वर्षे वाट पाहावी लागत होती. मात्र, महाराष्ट्रात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही संख्या २० -२५ वर आणली आहे. भविष्यात ही संख्या आणखी कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. महाराष्ट्राने उद्योगांना दिलेली चालना इतर राज्यांपुढे आदर्श ठेवणारी आहे, असे गौरवोद्गार नरेंद्र मोदी यांनी काढले.