पाटणा - पुणे दुर्घटनेप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोंढव्यातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही नागरिकांचा समावेश आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे रहिवासी असलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.
कोंडवा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारी बिल्डिंग उभारणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कांचन डेव्हलपर्सच्या पंकज व्होरांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आल्कन स्टायलस उभारणाऱ्या चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आल्कन स्टायलस लँडमार्कस या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डर्स आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जगदीशप्रसाद अग्रवाल (64), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (34), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (27), विवेक सुनिल अग्रवाल (21), विपूल सुनील अग्रवाल (21) या पाच जणांबरोबर साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच कांचन डेव्हलपर्स या बांधकाम संस्थेच्या तीन भागीदार बिल्डरवर गुन्हा नोंद करण्यात आला. पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या तिघांसह त्यांचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
15 जणांचा मृत्यू झाल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. बिल्डर आणि महापालिकेतील दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर या दुर्घटनेनंतर टीका केली आहे. कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच पुणे महापालिकेने देखील ही घटना गांभीर्याने घ्यावी अशी मागणी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांनी म्हटलंय की, पुण्याच्या कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आहे. मृतांच्या व जखमींच्या कुटुंबीयांना सरकारने मदत करावी व या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या दुर्घटनेतील मृतांची नावे आलोक शर्मा वय 28, मोहन शर्मा वय 20, अजय शर्मा वय 19, अभंग शर्मा वय 19, रवी शर्मा 19, लक्ष्मीकांत सहानी वय 33, अवधेत सिंह वय 32, सुनिल सिंग वय 35, ओवीदास वय 6, सोनाली दास वय 2 , विमा दास वय 28, संगीता देवी वय 26 अशी आहेत. हे सर्व जण बिहार आणि ओडिशामधील राहणारे आहेत. या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर ते काम करत होते.
आल्कर स्टायलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. 4 फुट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भिंतीच्या खालच्या बाजूला मजूरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करुन शोधकाम करण्यात येत होते़ वरुन पडणारा पाऊस आणि खोदकाम यामुळे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सर्व जण गाडले गेले. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या़ एनडीआरएफचे दलही त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तातडीने ढिगारा बाजुला करुन आत अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केले. पोकलेनच्या सहाय्याने सकाळी आठ वाजेपर्यंत ढिगारा बाजूला करण्यात आला होता. एका बाजूचा काही ढिगारा काढण्याचे काम बाकी आहे.
अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मध्यरात्री 1 वाजून 50 मिनिटांनी मिळाली. अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तातडीने तेथे पोहचले. त्यांना एक जण जिवंत आढळून आला. त्याने अग्निशामक दलाला पाहून आवाज दिला. त्याला प्रथम अग्निशमन दलाने वाचवून बाहेर काढले. त्याने मग जवानांना कोण कोण कोठे असून शकेल, याची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाने एक वाचलेला होता. त्याने आवाज दिला. त्याला प्रथम अग्निशमन दलाने तेथील ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू केले़ त्यात एका महिलेच्या डोक्यावर पत्रा पडल्याने ती वाचली होती तिचे पाय मात्र ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दलाने तिला बाहेर काढले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घटनास्थळी भेट दिली असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बिल्डर आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.