नवी दिल्ली - भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांची चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ पुणेकर असलेले गौतम बंबवाले यांची 2015 मध्ये पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी 2007मध्ये चीनमधील गुआँगझोहुमध्ये भारताचे पहिले काऊन्सील ऑफ जनरल बनण्याचा मान गौतम बंबवाले यांना मिळाला होता. 2009 ते 2014 या कालावधीदरम्यान त्यांनी परराष्ट्र खात्यातसह सचिव म्हणून काम केलं आहे.
फर्ग्युसन कॉलेजचा उंबरठा ओलांडल्यानंतर गौतम बंबवाले यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. बंबावले घराण्याची सनदी अधिकाऱ्याची परंपरा गौतम यांनी देखील कायम ठेवली. 1984मध्ये ते आयएफएस म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये रूजू झाले. 1985 आणि 1991 मध्ये बंबवाले यांची नियुक्ती हाँगकाँग आणि बीजिंगमध्ये करण्यात आली. 1993मध्ये त्यांनी अमेरिकन डिव्हिजन ऑफ मिनिस्टरच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली. याशिवाय अमेरिका, चीन आणि जर्मनी अशा महत्त्वांच्या देशात बंबवाले यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.