पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानातून आलेला एका लहान गायीच्या वासराचा फटो आपण सर्वांनीच बघितला असेल. पंतप्रधान मोदी त्या गायीला गोंजारताना, कुरवाळताना आणि तिला फिरवताना दिसले. यासंदर्भात X वर पोस्ट करत, 7, लोक कल्याण मार्गावर एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे, असे मोदी यांनी म्हटले होते. त्यांनी या छोट्या गायीचे नाव दीपज्योती, असे ठेवले आहे. तर ही छोटी गाय एवढी विशेष का आहे आणि कुठे मिळते? जाणून घेऊ...
ही पुंगनूर जातीची देशी गाय आहे. हिची किंमत 1 लाख रुपयांपासून काही लाख रुपयांपर्यंत असू शकते असा दावा केला जातो. महत्वाचे म्हणजे, ही गाय आकाराने लहान आणि गोंडस असल्याने कुणीही हिच्या प्रेमात पडेल. लोक अगदी आपल्या घराच्या किचनपर्यंत हिला घेऊन जातात अथवा मोकळे सोडतात. पंतप्रधानांच्या निवास्थानीही हीच काय आहे.
ही छोटी गाय कुठे मिळते? -ही गाय कुठे मिळते? हे सोशल मीडिया आणि गुगलवर बरेच सर्च केले जात आहे. तर ही पुंगनूर (Punganur) जातीची गाय आंध्र प्रदेशात आढळते. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात पंगनूर नावाचे एक ठिकाण आहे आणि याच ठिकाणावरून या गायीचे नाव पुंगनूर असे पडले आहे. ही गाय अपार्टमेंटमध्येही पाळली जाऊ शकते.
ही जगातील सर्वात लहान गुरांच्या जातींपैकी एक आहे. ही गाय जास्तीत जास्त 2.5 फूटांपर्यंत उंच असते. तसेच पूर्णपणे वाढ झाल्यास आणि निरोगी असताना या गायीचे वजन 200 किलोपर्यंत असू शकते.
यासंदर्भात न्यूज-18 ने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी म्हटले आहे की, ही गाय पंतप्रधान मोदींनी निवडली, मात्र आम्ही आंध्र प्रदेशचा गौरव पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाहून अत्यंत आनंदी आहोत. एक वेळी ही गोंडस गाय नामशेष होण्याच्या मार्गावर होती. शेतकऱ्यांनी अधिक दूध उत्पादनाला प्राधान्य दिल्याने या गायींची संख्या देशभरात केवळ 100 वर आली होती. मोठ्या गीयी प्रमाणे दूध देत नसल्याने शेतकरी या गायींना ओझे समजून विकू लागले होते अथवा सोडू लागले होते. मात्र आता पुन्हा एकदा या गायी पाळणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली आहे.
या गायीच्या दुधाला म्हटलं जातं 'गोल्डन मिल्क' -या गाईच्या दुधात अनेक पोषक घटक आढळतात. या गायीचे दूध इतर गायींच्या दुधाच्या तुलनेत चार पट विशेष असल्याचे बोलले जाते. तज्ज्ञ या गायीच्या दुधाला 'गोल्डन मिल्क' असेही म्हणतात. महत्वाचे म्हणजे, संपूर्ण आंध्र प्रदेशात हेच दूध देवांना अर्पण केले जाते. तिरुपती मंदिरातही याच दुधाने भगवान व्यंकटेश्वराला अभिषेक केला जातो. पुंगनूर गाईचे दूध A2 प्रकारचे आहे. इतर गायींच्या तुलनेत, या गायींच्या दुधात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमसह अधिक पोषक घटक आढळतात.