ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 03 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोहत्येविरोधी मोहिमेला पाठिंबा दर्शवत येथील बहुसंख्य मुस्लिम समुदाय असलेल्या गावात गोहत्या करणा-याला सशक्त दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मथुरा जिल्ह्यातील मदोरा गावात बहुसंख्य मुस्लिम समुदाय आहे. या गावातील ग्रामपंचायतीत हा ठराव मंजूर करण्यात आला असून जर कोणी गोहत्या केल्यास, त्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच, गोहत्येसंदर्भात माहिती देणा-या इसमाला 51, 000 रुपये बक्षिस स्वरुपात दिले जाणार आहे. हा निर्णय गावचे माजी सरपंच मोहम्मद गफ्फार यांनी जाहीर केला.
यावेळी मोहम्मद गफ्फार म्हणाले की, मुस्लिम गाईचा आदर करतात. त्यांनी ठरविले आहे की, गोहत्या करणा-या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. तसेच, गोहत्या करणा-या त्या व्यक्तीवर समाजाकडून बहिष्कार घालण्यात येईल. याचबरोबर त्या व्यक्तीजवळ दंडाचे पैसे नसतील, तर त्याच्या संपत्तीतून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल.
पंचायतीच्या या निर्णयाला पाठिंबा देत गावकरी दिन मोहम्मद म्हणाले की, आमच्या गावाला वाईट नाव नको आहे, म्हणून आम्ही गोहत्येच्या विरोधात आहेत. त्यामुळे पंचायतीने जाहीर केलेल्या शिक्षेचा निर्णय सर्व गावक-यांना मान्य आहे.
याचबरोबर या गावातील मुलींना घराबाहेर मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, यावर मोहम्मद गफ्फार म्हणाले की, आम्ही मोबाईल वापरावर बंदी घातली नाही. मात्र, मुलींनी त्यांच्या घरात मोबाईलचा वापर करावा. घराबाहेर करु नये. तसेच, या नियमाचे पालन न केल्यास 2,100 रुपयांचा दंड भरावा लागेल.