श्रीनगर / पिथौरागढ : ज्यांनी देशाला लुटले आहे आणि सर्वसामान्यांना बरबाद केले आहे अशांना या निवडणुकीत शिक्षा देण्याचा संकल्प करा. त्यामुळे भविष्यात कोणी तुमच्या आयुष्याशी खेळणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधकांवर हल्ला केला.सैन्यबहुल भागात जनतेला त्यांनी भावनिक आवाहन केले आणि ‘वन रँक, वन पेन्शन’चा मुद्दा काँग्रेसने ४० वर्षे प्रलंबित ठेवल्याबद्दल आणि सर्जिकल स्ट्राईकवर शंका घेऊन सैनिकांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणाले की, उत्तराखंडच्या निर्मितीला विरोध करणारा काँग्रेस पक्ष आज सपासोबत जाऊन बसला आहे. या राज्यात १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. या सरकारला हटवून भाजपचे सरकार आणण्याचे आवाहन त्यांनी केले. मोदी म्हणाले की, या मुख्यमंत्र्यांनी उत्तराखंडच्या विरोधात काय नाही केले? ते मागच्या दाराने सत्तेत आले आहेत. अन्यथा जनतेने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नसते. कलंकित उमेदवारांना तिकिटे का दिली?कलंकित नेत्यांना आम्ही पक्षातून बाहेर काढले. पण, मोदी यांनी त्यांना भाजपत घेऊन उमेदवारी का दिली असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला. असा ‘कचरा’ पक्षात का घेतला? असा सवाल त्यांनी केला. उत्तराखंडात रविवारी राहुल यांनी ७५ किमीचा रोड शो केला. ते म्हणाले की, कलंकित नेत्यांना भाजपात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचारावर बोलण्याचा मोदी यांना आता अधिकार नाही. मोदी म्हणतात की, ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. मग या कलंकित नेत्यांना भाजपाने उमेदवारी का दिली? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत रेनकोटचे जे शब्द मोदी यांनी वापरले होते, त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, असे शब्द मोदी यांच्या कार्यालयाच्या मोठेपणाला शोभणारे नाहीत. दरम्यान, या रोड शोमध्ये काही जणांनी भाजपाचे झेंडे फडकावून ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा दिल्या.
देश लुटणाऱ्यांना शिक्षा द्या: मोदी
By admin | Published: February 13, 2017 12:35 AM