इटानगर - शिक्षकांनी शिक्षा म्हणून 88 विद्यार्थीनींना संपूर्ण शाळेसमोर कपडे काढून उभं केलं. अरुणाचल प्रदेशच्या पापूम पारे जिल्ह्यातील सागाली येथील तानी हाप्पा भागातील शाळेत ही धक्कादायक घटना घडली. अरुणाचल प्रदेश पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. ऑल सागाली स्टुडंटस युनियनने शाळेच्या तीन शिक्षकांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशीचे पाऊल उचलले.
मागच्या आठवडयात शाळेतल्या तीन शिक्षकांना शाळेचे मुख्य शिक्षक आणि एका विद्यार्थीनीबद्दल अश्लील मजकूर लिहिलेली चिठ्ठी सापडली. सहावी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थीनींमध्ये ही चिठ्ठी फिरत होती. हा प्रकार शिक्षकांच्या कानावर आल्यानंतर ही चिठ्ठी कोणी लिहीली म्हणून त्यांनी विद्यार्थीनींकडे विचारणा केली. पण कोणीही समोर आले नाही. त्यामुळे शाळेतल्या तीन शिक्षकांनी सहाव्या आणि सातव्या इयत्तेतील 88 विद्यार्थीनींना संपूर्ण शाळेसमोर कपडे काढून उभं केलं.
एएसएसयूने सोमवारी सागाली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केली. इटानगर महिला पोलिसांकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. पोलीस सर्वप्रथम विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांची चौकशी करतील. अजून कोणालाही अटक केलेली नाही असे पापून पारे जिल्ह्याचे एसपी तुम्मी अमो यांनी सांगितले.