लखनौ - उत्तर प्रदेशच्याझांसी जिल्ह्यात काही लोकांनी सामाजिक बहिष्कारापासून सुटका करण्यासाठी एका दाम्पत्यास शेण खाणं आणि गोमुत्र पिण्याची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे ही शिक्षा मान्य नसल्यास 5 लाख रुपये दंड देण्याचा फतवाच या जात पंचायतीच्या पंचांनी काढला होता. मात्र, पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेतली अन् सहा जणांविरुद्ध कारवाई केली. या जोडप्याने आंतरजातीय विवाह केल्यामुळेच त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती.
झांसी जिल्ह्यातील प्रेमनगरच्या ग्वालटोली येथील ही घटना आहे. येथील रहिवासी असेलल्या भूपेश यादवने पाच वर्षांपूर्वी आस्था जैन या मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. विशेष म्हणजे दोनही कुटुंबीयांच्या परवानगीने हा विवाह संपन्न झाला होता. मात्र, समाजाला हे लग्न मान्य नसल्याने जात पंचायतीने या दाम्पत्यास समाजातून बहिष्कृत केले. त्यानंतर, भूपेशच्या वडिलांना धमक्याही देण्यात येऊ लागल्या. गेल्या वर्षी बहिणीच्या लग्नाला समाजातील एकही व्यक्ती आली नसल्याचे भूपेशने सांगितले.
समाजाने बहिष्कारापासून सुटका करण्यासाठी भूपेशसमोर दोन अटी ठेवल्या होत्या. त्यानुसार, भुपेशच्या पत्नीने शेण खाणे आणि गोमुत्र पिणे किंवा ही अट मान्य नसल्यास समाजाला 5 लाख रुपये दंड देणे, अशी अट होती. त्यामुळे, भूपेशने जिल्ह्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकजे जातपंचायतीची तक्रार केली. त्यानंतर, झांसीचे जिल्हाधिकारी शिव शहाय अवस्थी आणि एसएसपी डी. प्रदीप यांनी पीडित कुटुंबीयांच्या घरी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले. याप्रकरणी संपूर्ण माहिती घेऊन जात पंचायतीच्या संबंधित पुढाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.