मुंबई - कोरोना व्हायसरपासून पसरत असलेल्या कोविड19 या आजाराबाबत लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. देशात जवळपास 2 महिने कडक लॉकडाऊन पाळण्यात आला, सध्याही अनलॉकमध्ये, लॉकडाऊन आहे. मात्र, कोरोनाचं संकट काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. याउलट कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे, आता कोरोनासोबतच आपण जगायला शिकलं पाहिजे. त्यामुळे, मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर्स हे नित्याचे बनले आहे. मात्र, अद्यापही काहीजम चेहऱ्याला मास्क न लावताच घराबाहेर पडतात, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
देशात आणि राज्यात अनलॉक व मिशन बिगेन अगेन ही प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने काही जिल्ह्यांनी पुन्हा एकदा 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे, नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना आम्हाला जगू देणार की नाही, असंच सामान्य नागरिकांकडून बोललं जातंय. आरोग्य मंत्रालयाने एक व्हिडिओ जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये आता सोशल डिस्टन्स पाळूनच कोरोनाशी लढावं लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगताना दिसून येत आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर या नियमांचं पालन करावंच लागेल.
देशातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने मास्क न लावल्यास दंड आकारणी सुरु केली आहे. फिरोजाबाद जिल्ह्यातील पोलीस व स्थानिक प्रशासनानेही हे नियम लागू केले आहेत. तेथील एका तरुणास पोलिसांची चांगलीच शिक्षा सुनावली. चेहऱ्यावर मास्क न घालणाऱ्या व्यक्तीस तब्बल 500 वेळा 'मास्क लगाना है', असे लिहिण्याची शिक्षा केली. पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व डॉक्टर्स यांनी मास्क की क्लास या नावाने ही शिक्षा मोहीम सुरु केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिक्षक सचिंद्र पटेल म्हणाले की, या शिक्षाप्रणालीला मास्क की क्लास हे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार, मास्क न परिधान करणाऱ्या व्यक्तीस दंड न ठोठवता, त्यांना एक हॉलमध्ये बसविण्यात येते. या हॉलमध्ये मास्क की क्लास हे 500 वेळा लिहिण्याचा व्हिडिओ दाखविला जातो. त्यानुसार 3 ते 4 तासात ते लिहून घेण्यात येते. शहरातील टिळक महाविद्यालयासमोरील ठिकाणाहून या मोहिमेला सुरुवात झाल्याचे पटेल यांनी म्हटले.