पंजाबमध्ये अवघ्या २४ तासांत विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत जमावाने दोघांची हत्या केली आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शनिवारी सायंकाळी विटंबनेच्या प्रयत्नानंतर एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. तर रविवारी सकाळी कपूरथला येथील गुरुद्वारामध्ये निशान साहिबचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचाही नंतर मृत्यू झाला आहे. मात्र, हे प्रकरण चोरीचे असून विटंबनेचे नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, कपूरथलामधील निजामपूर येथे निशान साहिबचा विनयभंग करण्याचा कथित प्रयत्न केल्यानंतर संबंधित आरोपीला स्थानिकांनी मारहाण केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, चौकशी गुरुद्वारासमोरच व्हावी, असा आग्र स्थानिकांनी केला. एवढेच नाही, तर स्थानिक लोकांची पोलिसांसोबतही झटापट झाल्याचे समजते. आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला.
गुरुद्वाराचे केअरटेकर अमरजित सिंग यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. कपूरथला जिल्ह्यातील निजामपूर गावातील गुरुद्वारामध्ये एका व्यक्तीने निशान साहिबची विटंबना केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर स्थानिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. गावकऱ्यांनी त्याचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओ बनवताना स्थानिकांनी म्हटले आहे, की त्यांच्या शेजारी पोलीस चौकी आहे, मात्र ते त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही. त्याला आपल्या ताब्यातच ठेवू. त्यांनी शीख संघटनांना बोलावले आहे. याचा निर्णय तेच करतील.