चंडीगड : सणासुदीच्या दिवसांत दरवर्षी दुधामध्ये भेसळ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. पंजाबमध्ये सणासुदीच्या काळात आतापर्यंत घेण्यात आलेल्या दुधाचे 41 टक्के नमुने फेल झाले आहेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तयार केलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या दोन महिन्यांत 676 दुधाचे नमुने गोळा करण्यात आले असून, त्यापैकी 278 असुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. यादरम्यान, प्रशासन सुक्या मेव्याच्या दर्जाचीही तपासणी करत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात असुरक्षित दुधाचा वापर आणि मिठाई सजवण्यासाठी चांदी वर्कच्या नावाखाली अॅल्युमिनियमचेही वर्क बाजारात विकली जातात. यामुळे प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
मिठाई सजवण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणार्या शुद्ध चांदीच्या वर्कऐवजी अॅल्युमिनियमचे वर्क केला जातो, हे देखील आरोग्यासाठी एक मोठे आव्हान बनले आहे. या महिन्यात चांदीच्या वर्कची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्यभरात 164 नमुने घेण्यात आले आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासले जात असले तरी, गोळा केलेले अनेक नमुने चांदीऐवजी अॅल्युमिनियमचे होते. तज्ज्ञांच्या मते, अॅल्युमिनियमचे सेवन आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मानकांनुसार, अॅल्युमिनियमचा वापर मानवी वापरासाठी असुरक्षित आहे.
एफडीएने सुकामेव्याच्या गुणवत्तेच्या चाचणीवरही विशेष भर दिला आहे. यासाठी आतापर्यंत 100 हून अधिक नमुने घेण्यात आले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण निकषांचे पालन करून त्यांनी सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी चांदीचे कागद, दूध आणि सुक्या मेव्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती, असे पंजाबचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. अभिनव त्रिखा यांनी सांगितले. तसेच, ऑगस्टमध्ये आम्ही दूध भेसळीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एक आठवड्याची विशेष मोहीम सुरू केली होती आणि प्रत्येक जिल्ह्यात दररोज दुधाचे किमान पाच नमुने घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते, असेही डॉ. अभिनव त्रिखा यांनी सांगितले.