Punjab AAP: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी वीज बिलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीपूर्वी आप सरकारने पंजाबच्या जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वास दिले होते. ते आश्वास मान यांनी पाळलेच, पण आता त्यांनी 300 ऐवजी 600 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
भगवंत मान यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, 1 जुलैपासून राज्यातील प्रत्येक घराला 300 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्वतः मान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. पण, आता 300 युनिट नव्हे तर, 600 युनिट मोफत वीज (Frees Electricity) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारी पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मान यांनी ट्विट करत म्हटले की, 'आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पंजाबच्या जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. पण, आता पंजाबमधील नागरिकांना प्रत्येक बिलावर 600 युनिट मोफत वीज मिळणार आहे. पंजाबच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार.'