नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पंजाबच्याआप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजकारण्यांसह तब्बल 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली आहे. ज्या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली त्यात अनेक निवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांचा समावेश आहे.
सुरक्षा काढून घेण्यापूर्वी पंजाब सरकारने या मुद्द्यावर आढावा बैठक घेतली होती, ज्यामध्ये 424 लोकांना सुरक्षेची गरज आहे का यावर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्य सरकारने सुरक्षा कमी करण्याचे आदेश जारी केले आहेत. सुरक्षा काढून घेण्यामागचे एक कारण म्हणजे पंजाब पोलिसांमध्ये आधीच कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचेही सांगितले जात आहे. अशा स्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामान्य ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढणे कठीण होत आहे.
एप्रिलमध्ये याआधी पंजाब सरकारने माजी मंत्री, माजी आमदार आणि इतर नेत्यांसह 184 लोकांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग आणि काँग्रेस आमदार प्रताप सिंग बाजवारे यांच्या पत्नी यांच्या कुटुंबाची सुरक्षा गेल्या महिन्यात काढून घेण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विजय सिंगला यांनी कंत्राटे देताना टक्केवारी कमिशनची मागणी केली होती. विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले आहे. विजय सिंगला यांच्यावर कारवाई करताना भगवंत मान म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी मला सांगितले की, मी लाचखोरी, एका पैशाची बेईमानी सहन करू शकत नाही. मी वचन दिले होते की ते होणार नाही. आंदोलनातून बाहेर पडलेले आम्ही लोक आहोत आणि ते आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात होते."