पश्चिम बंगालनंतर पंजाब! आप सर्व १३ जागा जिंकेल; मान यांचे काँग्रेसविरोधात उघड संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:09 PM2024-01-24T15:09:41+5:302024-01-24T15:10:07+5:30
ममता यांच्यानंतर आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये वेगळे लढण्याचे संकेत दिले आहेत.
एनडीएविरोधात उभे राहण्यापूर्वीच इंडिया आघाडीची शकले पडू लागली आहेत. काँग्रेसनेआपला प्रस्ताव मान्य केला नसल्याचा आरोप करत ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये वेगळी चूल मांडण्याची घोषणा केलेली असतानाच आता आणखी एक राज्य काँग्रेसमुळे आघाडीपासून फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ममता यांच्यानंतर आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये वेगळे लढण्याचे संकेत दिले आहेत. आप पंजाबच्या सर्व १३ जागांवर निवडणूक जिंकेल असे वक्तव्य मान यांनी केले आहे. याचबरोबर मान यांनी आपण ममता बॅनर्जी यांच्या मार्गावर जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.
दिल्लीत आप सत्ताधारी काँग्रेसलाच विरोध करून सत्तेत आली होती. पंजाबमध्ये देखील काँग्रेसची सत्ता उलथवून आप सत्तेत आली आहे. यामुळे इंडिया आघाडीत केवळ भाजपला विरोध म्हणून आप काँग्रेससोबत जात होती. यामुळे भविष्यात आपचा मतदार दुखावला जाण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेसने सहकारी पक्षांना दाबण्याचे तंत्र अवलंबायला सुरुवात केली आहे. त्या पक्षांचे उमेदवार दुसऱ्या पसंतीची मते असतील किंवा त्यांचे खासदार असतील त्या जागाही काँग्रेस त्यांच्याकडून मागत आहे. याचाच परिणाम तृणमुलच्या वेगळे होण्यात झाला आहे.
#WATCH चंडीगढ़: INDIA गठबंधन पर पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी के बयान पर पंजाब के मुख्यमंत्री और AAP नेता भगवंत मान ने कहा, '...पंजाब में हम ऐसा(कांग्रेस के साथ गठबंधन) कुछ भी नहीं करेंगे , कांग्रेस के साथ हमारा कोई संबंध नहीं है।" pic.twitter.com/Ez1R7PCiUn
— ANI_HindiNews (@AHindinews) January 24, 2024
यामुळे आप देखील जागावाटपावरून नाराज होऊन वेगळा निर्णय घेऊ शकते. काँग्रेसची मागणी आप देखील धुडकावून लावू शकते. असे झाल्यास केजरीवाल देखील वेगळी निवडणूक लढण्याची घोषणा करू शकतात. ते देखील काँग्रेसच्या अडवणुकीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करू शकतात. आप देखील लवकरच यावर घोषणा करू शकते असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.