चंदीगढ - काँग्रेसने पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने पंजाबमध्ये विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे. राहुल गांधी यांनी रविवारी लुधियाना येथील सभेत ही महत्वाची घोषणा केली. 'चन्नी जी गरिबातून वर आले आणि मोठे नेते झाले. ते मुख्यमंत्री झाले, तरी त्यांच्यात अहंकार दिस नाही, अशा भावना यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केल्या. चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केल्यामुळे नवज्योतसिंग सिद्धूंची पिछेहट झाल्याची चर्चा होत आहे. मात्र, सिद्धूंनी यावर लगेचच मौन सोडले.
चन्नी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सिद्धूंनी स्वत:ला पंजाबचा आशिक असे संबोधले आहे. मी कुठल्याही पदाचा लालची नसून केवळ पंजाबच्या लोकांचे जीवन सरळ व सुखी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, चरणजीतसिंग चन्नी यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर या निर्णयाचे स्वागत आणि कौतूक केले. लुधियानातील एका रॅलीला डिजिटल पद्धतीने संबोधित करताना सिद्धू यांनी आपल्या मन की बात केली. दरम्यान, राज्यात 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे.
आम आदमी पक्षाने पंजाबसाठी भगवंत मान यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे, काँग्रेसकडून कोणाचे नाव घोषित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात, नवज्योतसिंग सिद्धू आणि चरणजीतसिंग चन्नी या दोन नावांचीच चर्चा होती. अखेर, चन्नी यांच्या नावाची राहुल गांधींनी घोषणा केली आणि पंजाबच्या निवडीचा प्रश्न मिटला. दरम्यान, राहुल गांधींनीच एका दलित व्यक्तीला मुख्यमंत्री केले, हे बदलाचे पाऊल असून लोकांच्या आयुष्यात समाधानाचे क्षण घेऊन येईल, असे उद्गारही सिद्धू यांनी काढले.