चंदिगड - पंजाबमधील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाद उफाळलेले आहेत. राज्यातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडताना दिसत आहे. दरम्यान, पंजाबमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक माजी मंत्री राणा गुरमीत सिंग सोढी यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
पंजाबमधील फिरोझपूर येथील गुरूहरसहाय येथून आमदार असलेले राणा गुरमीत सिंग सोढी यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेले राजीनाम्याचे पत्र ट्विटरवर पोस्ट करत आपल्या मनामधील खदखद व्यक्त केली आहे. त्यात ते लिहितात की, पंजाबची घुसमट आणि असहाय परिस्थिती आपल्याने पाहिली जात नाही आहे. काँग्रेसने राज्याची सुरक्षा आणि सांप्रदायिक सौहार्द पणाला लावला आहे. अत्यंत दु:खी अंत:करणाने मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
राणा गुरमीत सिंह सोढी यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर पंजाब भाजपाचे प्रभारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. राणा गुरमीत हे अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये क्रीडामंत्री होते. कॅप्टन यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर गुरमीत यांचेही मंत्रिपद काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून ते काँग्रेसपासून दूर झाले होते.
राणा गुरमीत सिंग सोढी हे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. ६७ वर्षीय राणा गुरमीत सिंग सोढी हे १९७३ पासून सक्रिय राजकारणामध्ये आहेत. ते पंजाबमधील काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एक मानले जातात. २००२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. तेव्हापासून सलग निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.
मात्र मंत्रिपद गेल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय म्हणून पक्षाने त्यांच्याकडे कुठलीही मोठी जबाबदारी सोपवली नव्हती. पक्षामध्ये ते बाजूला पडले होते. दरम्यान, ते भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर आता कॅप्टन अमरिंदर सिंग हेही थेट भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.