- बलवंत तक्षक चंदीगड : काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ८ उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जारी केली असून, यात मुख्यमंत्री चरणजिंत सिंग चन्नी यांंचा समावेश आहे. चन्नी भदौड व चमकौर साहिब या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.तिसऱ्या यादीनुसार कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध काँग्रेसने पटियाला मतदारसंघातून माजी महापौर विष्णू शर्मा यांना मैदानात उतरविले आहे. माजी मंत्री लाल सिंग हे या जागेची दावेदारी करीत होते. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिर सिंग यांच्याविरुद्ध काँग्रेसने फलियांवाला मतदारसंघातून मोहन सिंग यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार रमिंदर आवला यांचे तिकिट कापण्यात आले आहे. जलालाबादऐवजी दुसऱ्या मतदार संघातून त्यांनी उमेदवारी मागितली होती. सुखबिर सिंग बादल यांच्याविरुद्ध लढण्यास नकार दिल्याने त्यांचे तिकीट कापण्यात आले. माजी मंत्री पवन बन्सल यांचे पुत्र मनीष बन्सल यांना बर्नालामधून उमेदवारी देण्यात आली आहे. नवांशहरचे आमदार अंगद सिंह यांच्याऐवजी सतबीर सिंह सैनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Punjab Assembly Election 2022: मुख्यमंत्री चन्नी निवडणूक भदौडमधूनही लढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 7:00 AM