Punjab Assembly Election 2022 : मेरे छोटे-छोटे बच्चे है... आमदार पत्नीचं तिकीट कापल्यानं पतीला रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 09:20 AM2022-01-27T09:20:54+5:302022-01-27T09:22:00+5:30
पक्षाकडून नेहमीच गरिबांची बळी देण्यात येतो, अशी उद्विग्न भावनाही जसमेल यांनी यावेळी बोलून दाखवली
चंढीगड - पंजाबमध्ये काँग्रेसने उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला आहे. अनेकांनी राजी-नाराजी समोर आली असून विद्यमान महिला आमदाराचे तिकीट कापल्याने त्यांच्या पतीला अश्रू अनावर झाले होते. फिरोजपूर ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार सत्कार कौर यांना यावेळी काँग्रेसने तिकीट नाकारले. उमेदवारांच्या यादीत पत्नीचं नाव नसल्याचे पाहून पती जसमेलसिंह लाड्डींना कॅमेऱ्यासमोर मोठ-मोठ्याने रडू कोसळले.
पक्षाकडून नेहमीच गरिबांची बळी देण्यात येतो, अशी उद्विग्न भावनाही जसमेल यांनी यावेळी बोलून दाखवली. मी पक्षासाठी खूप मेहनत घेतली, माझी लहान-लहान मुलं आहेत, पक्षाने किमान त्यांच्याकडे तरी पाहायला हवं होतं. मी केवळ विनंती करू शकतो, बाकी पक्षाने निर्णय घ्यायचा आहे, असेही जसमेल यांनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करताना म्हटले.
फिरोजपूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी यंदा काँग्रेस आशु बांगड यांना उमेदवारी दिली आहे. आशु यांना यापूर्वी आम आदमी पक्षाने याच मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. मात्र, आपच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत आशु यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान, काँग्रेस पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी आशु यांना तिकीटच घोषित केले होते. त्यामुळे, या यादीत त्यांना उमेदवारी मिळाली आहे.
काँग्रेसमध्ये 4 जागांवर बंडखोरी
पंजाबमधील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये, सुनाम येथून दामन थिंद बाजवा, साहनेवालमधून सतविंदर कौर बिट्टी, खरड येथून जगमोहन कंग आणि समरालामधून अमरीक ढिल्लो यांनी बंडखोरी करणार असल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान, यापूर्वी सोनू सूदची बहिणी मालविका सूद यांना तिकीट दिल्याने काँग्रेस आमदार हरजोत कमल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर, हरगोविंदपूर येथील विद्यमान आमदार हरविंदरसिंग लाड्डी हेही नाराज असल्याची चर्चा आहे.