Navjot Singh Sidhu: 'पंजाबच्या जनतेचा AAPवर विश्वास, त्यांनी चांगला निर्णय घेतला'- नवज्योतसिंग सिद्धू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 04:16 PM2022-03-11T16:16:58+5:302022-03-11T16:17:05+5:30
Navjot Singh Sidhu: 'मतदार कधीच चुकीचे नसतात, त्यांना राज्यात बदल हवा होता आणि त्यांनी तो घडवला. मतदाराचा आवाज, हा देवाचा आवाज असतो.'
चंदीगड: काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. पाचपैकी चार राज्यात भाजपने बहुमत मिळवले, तर पंजाबमध्ये (Punjab Assemble Election Result) काँग्रेसला (Congress) धक्का देत आप(AAP)सत्तेत आली. आपने मिळवलेल्या अभुतपूर्व यशामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. या निकालानंतर आज काँग्रेसचे पंजाब प्रमुख नवज्योतसिंग (Navjot Singh Sidhu ) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
'AAPवर लोकांचा विश्वास'
माध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले की, ''हे बदलाचे राजकारण आहे, नवीन सरकार आणण्याच्या या निर्णयाबद्दल मी पंजाबच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. मतदार कधीच चुकीचे नसतात, त्यांना राज्यात बदल हवा होता आणि त्यांनी तो घडवला. यापूर्वी आम्हाला सहावेळा निवडून दिले होते. मतदाराचा आवाज, हा देवाचा आवाज असतो. या निवडणुकात लोकांचा आपवर विश्वास होता आणि त्यांनी तो दाखवून दिला. आपण जनतेचा कौल नम्रतेने स्विकारायला हवा," असे सिद्धू म्हणाले.
#WATCH "People who dug holes for Sidhu got buried in holes 10ft deeper. Let bygones be bygones... People have voted for AAP for a change, I congratulate them... New seeds have to be sown... not 'chinta' but 'chintan' should be done": PCC chief Navjot S Sidhu#PunjabElections2022pic.twitter.com/mGrbxVfFT0
— ANI (@ANI) March 11, 2022
'माझ्यासाठी देश प्रथम'
''पंजाबची उन्नती हे आमच्यासाठी सर्वात आधी आहे. हेच आमचे ध्येय आहे आणि त्यापासून आम्ही कधीच भरकटलो नाहीत. जेव्हा एखादा योगी धर्मयुद्धावर असतो, तेव्हा तो सर्व संबंध तोडून, बंधनांपासून मुक्त होऊन राष्ट्राची सेवा करतो. त्यावेळेस त्याला मृत्यूची भीती नसते, माझ्याबाबत तसेच आहे. मी नेहमी राष्ट्राला प्रथम स्थान दिले आहे. निकाल आमच्या बाजूने नव्हता, पण मी इथे पंजाबमध्ये आहे आणि इथेच राहणार.''
'चिंता नाही, चिंतन करण्याची गरज'
ते पुढे म्हणाले, "माझे येथील जनतेशी असलेले नाते मर्यादित नाही, ते आध्यात्मिक आणि मनाचे मनाशी आहे. जनतेशी माझे नाते केवळ निवडणुकीतील विजय-पराजयापुरते नाही. मला पंजाबमधील लोकांमध्ये देव दिसतो आणि त्यांच्या कल्याणातच माझे कल्याण आहे. आता जे व्हायचे होते, ते होऊ गेले. आता चिंता करण्याची नाही, चिंतन करण्याची गरज आहे. त्यामुळे मी पंजाबच्या जनतेचे आभार मानतो आणि आपला शुभेच्छा देतो.''
आपकडून सिद्धूंचा पराभव
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना आम आदमी पार्टी (AAP) च्या जीवनज्योत कौर यांच्याकडून 6,000 मतांच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. सिद्धूंना 32,929 मते मिळाली, तर जीवनज्योत कौर यांना 39,520 मते मिळाली.
आपचा मोठा विजय
AAP ने पंजाब विधानसभा निवडणुकीत 92 जागांवर विजय मिळवून 117 सदस्यांच्या विधानसभेत तीन चतुर्थांश बहुमतासह राज्यात आपले सरकार स्थापन केले. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाला दोन जागा मिळाल्या. शिरोमणी अकाली दलाला (एसएडी) तीन जागा मिळाल्या, तर बहुजन समाज पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली.