नवी दिल्ली - देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचं (Elections) बिगुल वाजलं असून लवकरच निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, पंजाब आणि गोवा या 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, पंजाबमध्येही 14 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणुका होत आहेत.
आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी निवडणुकांची घोषणा करताना कोरोना कालावधीवर भाष्य केलं. तसेच, निवडणुका थांबवता येणार नाहीत, 5 वर्षांनंतर निवडणुका घ्यावीच लागते असे म्हटले. कोरोना आणि लसीकरण यासंदर्भातही माहिती दिली. प्रत्येक मतदार केंद्रावर मास्क आणि सॅनिटायजर्सची सोय असणार आहे. तर, मतदानाची वेळ एक तास वाढविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत असून 10 फेब्रवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. तर, पंजाब आणि गोव्यात एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. त्यानुसार, पंजाब आणि गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर, 10 मार्चला मजमोजणी होणार आहे.
पाचही राज्यातील उमेदवारांसाठी 14 जानेवारी पासून नामनिर्देशित अर्ज उपलब्ध असणार आहेत. तर, नामनिर्देशित अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी आहे. 24 जानेवारी रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. तर, 27 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 10 फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे.
म्हणून पंजाबची निवडणूक चर्चेत राहणार
पंजाबमध्ये नुकतेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत झालेली गडबड, माजी मुख्यंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनी काँग्रेसला केलेला रामराम आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमारेषेवर तब्बल वर्षभर चाललेलं आंदोलन, या घटनांमुले पंजाबच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. सध्या पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार असून चरणजीतसिंग हे मुख्यमंत्री आहेत. तर, आम आदमी पक्षानेही चंढीगड महापालिका निवडणुकीत वर्चस्व मिळवले. त्यामुळे, पंजाबमध्ये आप आणि भाजपच्या प्रचारयंत्रणेकडेही देशाचे लक्ष लागून असणार आहे.