नवी दिल्ली - गेल्या काही काळात घडलेल्या झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे पंजाबमधील विधानसभेची निवडणूक खूप रंगतदार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नव्या पक्षाची घोषणा करत भाजपासोबत आघाडी करण्याची घोषणा केली आहे. पंजाबमध्ये बऱ्यापैकी जनाधार असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष, भाजपा आणि सुखदेव सिंह ढिंढसा यांचा शिरोमणी अकाली दल (संयुक्त) यांच्यातील आघाडीमुळे पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलली असून, त्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ओपिनियन पोलमध्ये अमरिंदर सिंग आणि भाजपा यांच्यातील आघाडीमुळे कुठल्या पक्षाचे सर्वाधिक नुकसान होणार, अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नामधून धक्कादायक समीकरण समोर आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपासोबत लढणाऱ्या शिरोमणी अकाली दल पक्षाने यावेळी भाजपाची साथ सोडून बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही पंजाबमधील निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. तर काँग्रेस मात्र या लढाईत एक एकटी पडली आहे. मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्यामध्ये सारे काही आलबेल नाही आहे. अशा परिस्थितीत विधानसभेच्या या अटीतटीच्या लढाईमध्ये मुळचे काँग्रेसवासी असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भाजपा यांच्यामधील आघाडी नेमकं कुणाचं नुकसान करेल, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भाजपामधील आघाडीमुळे कुणाचं नुकसान होणार असा प्रश्न विचारला होता. यामध्ये १० टक्के लोकांनी सांगितले की, या आघाडीमुळे आपचे नुकसान होईल. तर २० टक्के लोकांनी सांगितले की, शिरोमणी अकाली दल पक्षाचं नुकसान होणार. तर तब्बल ६२ टक्के लोकांनी सांगितले की, या आघाडीमुळे काँग्रेसचं नुकसान होणार. ३ टक्के लोकांनी सांगितलं की, या आघाडीमुळे भाजपाचंच नुकसान होणार. तर तीन टक्के लोकांनी सांगितले की, कुणाचेही नुकसान होणार नाही. उर्वरित दोन टक्के लोकांनी या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, असं सांगितलं.कॅप्टन आणि भाजपा आघाडीमुळे कुणाचं होणार नुकसान?आप -१० टक्केअकाली दल -२० टक्केकाँग्रेस - ६२ टक्केभाजपा - ३ टक्केकुणालाच नाही - ३ टक्केमाहिती नाही - २ टक्के