चंदिगढ: पाच राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभांना जोर आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेते पक्ष बदलत आहेत. पंजाबमधील एका नेत्यानं ४६ दिवसांत तीनदा पक्ष बदलता आहे.
पंजाबच्या हरगोविंदपूरचे काँग्रेस आमदार बलविंदर सिंह लड्डी यांनी शुक्रवारी पक्षाला रामराम करत भाजपचं कमळ हाती घेतलं. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ आणि नेते फतेह जंग सिंग यांनी बलविंदर यांना पक्ष सदस्यत्व दिलं. लड्डी यांचा पक्षप्रवेश म्हणजे घरवापसी असल्याचं भाजपनं सांगितलं.
याआधी लड्डी यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी काँग्रेसचा हात सोडला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ६ दिवसांमध्येच त्यांचं मतपरिवर्तन झालं. त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. आता ११ फेब्रुवारीला त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
लड्डी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. डिसेंबरमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. पण भाजपनं मंदीप सिंग यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या लड्डी यांनी पक्ष बदलला.