चंदीगड: आज काँग्रेसने पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने पंजाबमध्ये विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे. राहुल गांधी यांनी आज लुधियाना येथील सभेत ही महत्वाची घोषणा केली. 'चन्नी जी गरिबातून वर आले आणि मोठे नेते झाले. ते मुख्यमंत्री झाले, तरी त्यांच्यात अहंकार दिस नाही, अशा भावना यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केल्या.
आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसमध्ये कुणीच मुख्यमंत्री बनण्यासाठी आलेला नाही. काँग्रेसचे नेते राज्याला पुढे नेण्यासाठी आले आहेत. कुण्या एकाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करणे कठीण काम होते. कारण, काँग्रेसमध्ये सर्वजण हिऱ्याप्रमाणे आहेत. चन्नी जी, सिद्धू जी आणि जाखड जी, हे सर्वजण एखाद्या हिऱ्याप्रमाणे आहेत. त्यांच्यातील कुणा एकाला निवडणे कठीण काम होते. म्हणूनच आम्ही पोल करुन राज्यातील जनतेलाच त्यांच्या मुख्यमंत्री ठरवण्याचे काम दिले होते. तुम्ही ते काम योग्यरित्या पूर्ण केले आणि राज्याला गरीबीतून आलेला गरीबीची जाण असलेला नेता निवडला, असे मत राहुल गांधींनी व्यक्त केली.
राहुल गांधी म्हणाले की, पंजाबच्या लोकांचे म्हणणे आहे की त्यांना गरीब घरातील मुख्यमंत्री हवा आहे. हा निर्णय कठीण होता, पण पंजाबच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी तो सोपा केला. तर, नावाच्या घोषणेनंतर चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, सर्व काम तुमच्या कृपेने होत आहे. मला हिम्मत हवी आहे, पंजाबची जनता माझी हिम्मत आहे. मी कधीही चुकीचे काम करणार नाही, पंजाबचे सोने करीन. पंजाबला पुढे नेण्यात नवज्योतसिंग सिद्धू आणि जाखड यांयेही मोठे योगदान आहे आणि पुढेही असेल, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
माझा सीएम चेहऱ्याला पूर्ण पाठिंबा असेल-सिद्धू
आपल्या भाषणात नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, आज निर्णयाची वेळ आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज घोषण होणार आहे. मला कोणतीही लालसा नाही. मी कधीच कोणाकडून काही मागितले नाही. पक्ष ज्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करेल, त्याच्या खांद्याला खांदा लावून मी सोबत काम करेन आणि त्यांनाच पाठिंबा देईन. या वेळी सिद्धूंनी स्वत:ला अरेबियन घोडा म्हणत हायकमांडकडे दुर्लक्ष करू नका, असा इशाराही दिला.