चंदीगड: पंजाबमध्ये सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष पुन्हा सत्ते मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. पण काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, याबाबत अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सध्या चरणजीत सिंग चन्नी मुख्यमंत्री आहेत, पण नवज्योत सिंग सिद्धूही स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मानत आहेत. यावरुनच आता सिद्धूंनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे.
एका सभेला संबोधित करताना सिद्धू म्हणाले की, 'नवा पंजाब बनवणे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आता तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री निवडायचा आहे. हायकमांडला त्यांच्या तालावर नाचू शकेल असा कमकुवत मुख्यमंत्री हवा आहे', असे वक्तव्य सिद्धूंनी केले. तसेच, उपस्थित जनतेला तुम्हाला असा मुख्यंत्री हवाय का? असा प्रश्न विचारला. यावेळी गांधी घराण्याला लक्ष्य करत सिद्धूंच्या समर्थनार्थांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
चन्नी दोन मतदारसंघातून उभेगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमरिंदर सिंग यांची पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर अनेक दिवसांपासून मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्नशील असलेल्या सिद्धूंचे स्वप्न पूर्ण झाले असते, पण ऐनवेळी पक्षाने चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. चन्नी आता सिद्धूंना मागे टाकताना दिसत आहेत. 20 फेब्रुवारीच्या पंजाब निवडणुकीसाठी काँग्रेसने चन्नींना दोन मतदारसंघ दिले आहेत. यावरुन पक्ष त्यांना पाठिंबा देत असल्याचे जाणवत आहे.
रविवारी होऊ शकते घोषणारविवारी लुधियानामध्ये राहुल गांधी पंजाबसाठी काँग्रेसचा मुख्यंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात राहुलच्या पंजाब दौऱ्यात, चन्नी आणि सिद्धू या दोघांनीही मंचावर एकजूट दाखवली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून कल्पना घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा यावर जनमत चाचणी सुरू केली. या मतदानासाठी काँग्रेसने केलेल्या आवाहनात मतदारांना तीन पर्याय देणारा पंजाबी भाषेत रेकॉर्ड केलेला संदेश आहे. सिद्धू खालोखाल चन्नी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.