Punjab Assembly Election: सिद्धूंचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी पाकिस्तानकडून शिफारस, कॅप्टनचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 05:37 PM2022-01-24T17:37:36+5:302022-01-24T17:37:52+5:30
Punjab Assembly Election: अमरिंदर सिंग यांनी दावा केला की, त्यांनी त्यावेळेस पाकिस्तानची विनंती अमान्य करुन मंत्रिमंडळातूनही सिद्धूंची हकालपट्टी केली.
नवी दिल्ली: 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मोठा दावा केला आहे. अमरिंदर सिंग म्हणाले की, नवज्योतसिंग सिद्धू यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याची शिफारस पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती.
सोमवारी पत्रकार परिषद घेताना कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, 'पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विनंती केली होती की, सिद्धू माझे जुने मित्र आहेत. तुम्ही सिद्धूंना तुमच्या मंत्रिमंडळात घेतले तर मी आभारी राहीन. त्यांनी काम न नसल्यास त्यांना काढून टाका, पण आता मंत्रिमंडळात घ्या.'
अमरिंदर सिंग यांनी दावा केला की, मी नकार दिला आणि माझ्या मंत्रिमंडळातूनही काढून टाकले. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, सिद्धूंचा काही उपयोग नाही, ते पूर्णपणे अक्षम व्यक्ती आहे. त्यांना काम कसे करावे हेच कळत नाही. 28 जुलै रोजी मी त्यांना माझ्या मंत्रिमंडळातून काढून टाकले, असे कॅप्टन म्हणाले.
पंजाबमध्ये कॅप्टनचा पक्ष भाजपसोबत
कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे की आज आम्ही पंजाबमध्ये भाजपसोबत निवडणूक लढवत आहोत. देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थैर्यासाठी आम्ही भाजपसोबत आलो आहोत. अमरिंदर सिंग यांनी आज पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.